सकाळ चित्रकला स्पर्धा २०२३
राज्यव्यापी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ येत्या २२ जानेवारीला.... शालेय मुलांबरोबरच तरुण, दिव्यांग विद्यार्थी, पालकांना ज्येष्ठ नागरीकांनाही सहभागाची संधी....
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी १९८५पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी ‘सकाळ - चित्रकला स्पर्धा - २०२३’ यंदा रविवार (ता. २२ जानेवारी) या दिवशी आयोजित केली जाणार आहे. एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण राज्यात आयोजित केली जाणारी स्पर्धा म्हणून ‘सकाळ - चित्रकला स्पर्धे’ची सर्वत्र ख्याती आहे. गेली ३७ वर्षे सातत्याने ही स्पर्धा होत असून यंदा स्पर्धेचे हे ३८वे वर्ष आहे. कोरोनाकाळात सुद्धा ऑनलाइन स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली होती.
आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून, २०१८ साली आयोजित केलेल्या स्पर्धेतील लक्षणीय सहभागाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या जागतिक स्तरावरील प्रमाणित संस्थांनी घेतली आहे. मुलांना आपले विचार मुक्तपणे आणि कलात्मक पद्धतीने मांडता यावेत, यासाठी स्पर्धेची सुरवात झाली. दरवर्षी लाखो शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
स्पर्धेत सहभागासाठी वयाचे बंधन नाही. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व विविध विद्या शाखांच्या महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी, तसेच पालकांसाठी व आजी आजोबांसाठी खुली असेल. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. ही स्पर्धा एकूण चार गटांत घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष होणार असून, फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची व पालक आणि आजी-आजोबांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असेल.
स्पर्धेत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व पालकांना, चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे विनामूल्य दिला जाईल. स्पर्धेचे नियम व स्पर्धा केंद्रांचा तपशील व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व आजी-आजोबा यांच्यासाठीच्या ऑनलाइन स्पर्धेचे स्वरूप दैनिक ‘सकाळ’मधून लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९८८१५९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
गरजू विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी... राज्यभरातील प्रमुख शहरातील आश्रम शाळांमधील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी सुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रमुख शहरातील आश्रम शाळा व विशेष आणि दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेसाठी खालील व्हाट्सॲप क्रमांकावर विद्यार्थ्यांची नोंदणी करावी. ८६०५०१७३६६/९९२२४१९१५०
पालकांना व आजी-आजोबांना सुवर्णसंधी ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेचे हे ३८वे वर्ष असून, तीन पिढ्यांना जोडलेली ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेत १९८५पासून भाग घेतलेल्या, मात्र आता पालक किंवा आजी-आजोबा झालेल्यांसाठीही यंदाची 'सकाळ -चित्रकला स्पर्धा २०२३' सुवर्णसंधी आहे. या स्पर्धेत पालक व आजी-आजोबा देखील सहभागी होऊ शकतात.
धन्यवाद
कळावे,
मृणाल पवार
संचालिका, सकाळ माध्यम समूह
१) कोणत्याही गटासाठी रंगसाहित्याच्या विशिष्ट माध्यमाचे बंधन नाही. चित्र कोणत्याही रंगसाहित्याने रंगवावे.
२) स्पर्धेचा निकाल फेब्रुवारी २०२३ मध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ‘सकाळ’मधून जाहीर केला जाईल.
३) त्यानंतर पुणे विभागीय आणि राज्य पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करण्यात येईल.
४) स्पर्धेत भाग घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना , महाविद्यालयीन युवक - युवतींना व पालकांना कोणतीही प्रवेश फी नाही.